घर
..घर...
कधी कधी मोकळ्या जागेवर चार एक विटा रचल्या जातात. सिमेंट वाळूच मिश्रण त्यावर लेपलं जातं. रंगांची उधळण केली जाते तरी त्याचे फक्त एका वास्तूत रूपांतर करण्यासाठी हा खटाटोप असतो. पण या वास्तूचे घरामध्ये रूपांतर होण्यास मात्र खूप कालावधी लागतो. त्या वास्तूला मायेच्या ओलाव्याचा गिलावा द्यावा लागतो. त्यावर संस्काराची लांबी रुंदी भरावी लागते. नंतर त्यासर्वांवर आपुलकी, प्रेम, जिव्हाळा यांचा रंगरुपी लेप लावावा लागतो. एवढं करून सुद्धा भागत नाही. नात्यांमधल्या ओढीचं Interior Decoration करावं लागतं. सुसंवादाची हवा खेळती राहावी म्हणून समंजसपणा आणि समजुतदारपणाचे पंखे असावे लागतात. सत्याचा मार्ग स्वच्छ दिसण्यासाठी सद्वर्तन, सदाचार, सदसद्विवेकबुद्धी, सुविचार यांसारख्या दिव्यांची प्रकाशयोजना करावी लागते. भूतकाळातील चांगल्या आठवणींची स्मृतिचिन्हे अभिमानाने भिंतीवर लावावी लागतात. त्याचप्रमाणे वाईट आठवणींची अडगळ सुद्धा माळ्यावर टाकून द्यावी लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या उपासनेचं छप्पर तयार करावं लागतं व 'विश्वास' नावाच्या वज्ररुपी अभेद्य फरशीने पाया रचावा लागतो.
खरंच, अशी घराची बांधणी असेल तर काय मज्जा येईल नाही....!
💐 *सुप्रभात* 💐
✍🏻 ( *शब्दगुरू* )
*गुरुनाथ पा.पाळेकर*
Comments
Post a Comment