महानुभाव संप्रदायातील मानवी आदर्श गुरुची वास्तवदर्शी कथा ... लेखक प्रा.श्री लक्ष्मण बालू पाटील (कवी सुबाल) वास्तवदर्शी कवी.


लेखमाला १.

           मानवातील मानवी भाव नित्य जागृत करणारा, एक मानुभाव आदर्श विचारठेवा चिरकाल प्रकाशमान करणारा एक अविनाशी दीपस्तंभाची  जीवन अनुभव गाथा ....
           मित्रहो, आज मी  एका नव्या विषयावर विचार मांडणार आहे. आपल्या या ब्लोंगवर वास्तवदर्शी विचार काव्य स्वरुपात व समीक्षक पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. आज वाचकप्रेमीसाठी नव्या विषयावर माहिती घेऊन आलो आहे.
 विषय :- मानवातील मानवी भाव नित्य जागृत करणारा, एक महानुभाव आदर्श. विचारठेवा चिरकाल प्रकाशमान करणारा एक अविनाशी दीपस्तंभाची जीवन अनुभव गाथा ....
                 ज्ञानाचा विचार सागर गुरु,
              जीवन मार्गस्त करणारा एक वाटसरू,
               तो ज्या वाटेने जातो,
             त्या वाटेने साऱ्या समाजास नेऊन तो सोडतो,
              प्रत्येकाच्या मनातील भाव ओळखून ,
                  त्यास स्वताचे खरे गाव दाखवितो.
              त्या गावातील श्रेष्ठ व्यक्ती म्हणून
           आपणास जो नाव देतो.
          जो आई,वडील बंधू,बहिण,
           सगेसोयरे सारे प्रेमाच्या पाझराणे
       जवळ करण्यास प्रवृत्त करतो.
      ज्याला कधी जन्म न मृत्यूची भीती असते.
त्याला फक्त भक्ताच्या इच्छेची व मनोरथाची  जाण असते,
          अशा व्यक्तीची ओळख ण करून देता,अनुभवातून ज्याच्या नावाची प्रचीती येते असा व्यक्ती म्हणजेच गुरु होय.

गुरूची ओळख
   गुरु या नावाचे व या उपाधीचे ज्या व्यक्तीने क्षणाक्षणावर पालन केले; असे थोर कलीयुगी सन्यासी साधूपुरुष  गुरुवर्य श्रीसरळ बाबाजी  मानुभाव. यांचा जीवन प्रसंग व खऱ्या भक्तांचा ज्ञानवर्धक अनुभव त्याच पदाला शोभनीय असणारे व्यक्तिमत्त्व श्रीं सुरेश देवराम डोळसे, नाशिक
     संस्थापक श्रीप्रभु प्रतिष्ठान, नाशिक  यांच्या वाणीतून  प्रकट ...       
ब्रम्हानंदं परम सुखदं
केवलं ज्ञानमूर्तीं!
द्वंद्वातीतं गगन सदृश्यं
तत्त्वमस्यादी  लक्षणम ।।
एकं नित्यं विमल अचलं
सर्वादिसाक्षीभूतम! भावातीतं त्रिगुण रहीतं सद्गुरूं तं नमामि !!
        मनुष्याचा जन्म लौकिक अर्थान जरी आईच्या उदरी होत असतो, आणि खरा जन्म हा गुरूद्वारा होत असतो, कारण मनुष्याचे जीवन हे गुरुवरच आधारित असते. आणि संतांची वाक्य किंवा बोलही तसेच आहेतव. एक माता गुरु, पिता गुरु, एक मित्र गुरु, एक विद्या ग्रुरु, एक सद्गुरु, एक सिद्धी गुरु,  ऐसे अनंत गुरु बोलिजती, परी मोक्षदाता श्रीगुरु तो वेगळाची असे.
        माझ्या जिवनात मोक्षदाता श्रीगुरू या रुपाने परमपूज्य परम महंत आचार्य कैवल्यवासी श्रीसरळ बाबाजी महानुभाव हे जीवनात आले आणि माझे अवघे जीवनच बदलून टाकले. आमच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याकडून उपदेश घेतला.
      आणि परमेश्वराच्या ज्ञान मार्गावर चालत राहिलो. आणि मला माझ्या खऱ्या गुरुची ओळख पटली. मला त्यांनी परमेश्वर दाखवला. ईश्वरी शास्त्राचे निरूपण केलं.
       माझ्यासाठी माझ्या गुरुंनी निरुपणाचे फार कष्ट केले आणि मला आता अनुसरणासाठी योग्य केले आहे.
       कारण मनुष्याचा गुरू तोच असतो, जो फोडून शब्दाचे भांडार वस्तू दाविती नीज सारं,तो सद्गुरु साचार अनाथांचा.''
       माझ्यासाठी माझ्या गुरुवर्य श्रीसरळ बाबाजीनी मला निरूपण केले. त्यांच्या जवळचे असणारे ब्रह्मविद्येचे भांडार फोडून मला ज्ञानदान दिले. मला आठवण येते त्यांच्या निरुपणाची. एक वेळ निरूपण करताना त्यांनी म्हटले,
मनुष्याचे ऐसें अनंत जन्म वाया गेले,
म्हेळीये जन्म दिधले,
मोळिये दिधले, शिवणेया दिधले,
रुंभणेया दिधले, मा एक जन्म येथे दीजो,
का होईल ते पाहिजो,
 या आचारातील २८८ च्या सूत्रावर निरूपण केले. आणि मला या ठिकाणी बोध झाला व अनुसरण्याची इच्छा झाली,  ती इच्छा कैवल्यवासी आचार्य श्रीसरळ बाबाजीच्या समोर बोलून दाखवली श्री बाबाजी समोरच तारिख निश्चित केली.
       खरोखरच परमेश्वर अवतार साधन दाता श्रीचक्रधर प्रभुनीच मला श्रीगुरुवर्याच्या मुखाने निरोपन करून अनुसरणास प्रवृत्त केले.  म्हणूनच मी गुरुवर्य कैवल्यवासी आचार्य सरळ बाबाजी याचे उपकार कधीही विसरू शकत नाही. फेडू शकत नाही. एका ठिकाणी म्हटलेच आहे ,
तया नमन माझे गुरू पदा
जेणे दाखविले आनंदकंदा
तो उपकार मज न फिटे कदा
देवा परमानंदा तूची फेडी....
असे म्हंटल्यास वावगे होणार नाही,.... की,..
महानुभाव पंथाचे मॅनेजमेंट गुरू अर्थातच माझे गुरुवर्य तथा उपाध्ये कुलभूषण परम पूज्य परम महंत आचार्य कैवल्यवासी श्रीसरळ बाबाजी महानुभाव,....

संस्थापक  ....
प्रणवाश्रम
मु पो रणाईचे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव*....

बाबांना जाऊन बरोबर एक वर्ष होईल,
बुधवार दिनांक २२ मे २०१९  रोजी प्रातःकाळी ५ (पाच) वाजता देहावसान झाले; अर्थात बाबा ईश्वर भेटीस गेले.
         त्या दिवशी वेळ सकाळी ६ वाजेची असेल,... नेहमी प्रमाणे कुणीतरी उपदेशी नामधारक, वासनिक किंवा पंथीय पूजनीय संत, महंत, भिक्षुक किंवा तपस्विनी माता भगिनींचा फोन असेल समजून फोन घेण्यासाठी फोन जवळ गेलो,.... तर काय फोनचे स्क्रिनवर असलेलं नाव बघितलं आणि एक धोक्याच्या कल्पनेने मनाला धक्का बसला...

तसे वाटणे साहजिकच होत. कारण तो फोन होता माझ्या आई चा,  आणि मला जो संशय होता तो खरा ठरला.....
         कारण त्या रात्री मित्र परिवारासोबत गप्पा करत असताना,... बाबांच्या तब्येतीच्या चौकशीत बाबाजी आता तरी ठीक आहेत,... परंतु किती साथ देतील हे परमेश्वरावर आहे,... हे सांगू शकत नाही याची जाणीव झाली होती.
       बाबांच्या प्रकृतीत सुधार ऐकून मन निश्चिंत झालेले. बाबांची तब्येत सुधारतेय ही बातमी रोजच कानावर पडायची,
      तरीही सकाळी आलेला फोन काळजाचे ठोके वाढवणारा ठरला, आणि फोनवर बाबा गेले हा शब्द ऐकून फोन हातातून सुटला ..... आणि मी निःशब्द झालो.....
     काही वेळ तर थक्क उभा राहिलो,... व घरात कुणाशीही काहीही न बोलता ताबडतोब कपडे बदलून हॉस्पिटल गाठलं,
       परंतु कुणाला विचारू माझे बाबा कुठं आहे, व करू तरी काय......  कारण 
       ज्या सत्पुरुषाने सख्या बापापेक्षाही जास्त प्रेम केलं, व आई पेक्षाही जास्त मायेची ऊब दिली, त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला..
       आता कोण काढणार ती ऊब भरून,  म्हणून त्यावेळी मला एकच ठिकाण दिसलं, ते माझे श्रीगुरुजी आचार्य श्रीवर्धनस्थ बाबाजी, ...... त्यांचा कासावीस झालेला निरागस चेहरा, कुणी तरी जवळची व्यक्ती अचानक सोडून गेल्याची खंत प्रकर्षाने दाखवून देत होती.
      मी नतमस्तक होऊन बाबांच्या मांडीवर डोकं ठेवलं, आणि खरंच सांगतो काहीही बोलू शकलो नाही की माझे बाबा कुठे आहे...😢
        कैवल्यवासी बाबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर,  *बाबांचा जीवन प्रवास हा तसा पंथीयांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे....
बाबांचा परीचय
       ज्या अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर तसेच परिसरातील गावागावात श्रीगोविंद प्रभू बाबांनी सव्वाशे वर्ष राज्य केलं त्याच विदर्भातील चांदुर बाजार तालुक्यातील, परसोडा ह्या गावात बाबांचा जन्म झाला.
      बाबाच्या परिवारात चुलते गुलाबराव व तसेच वडील किसनराव हे दोन भाऊ होते.  गुलाबराव यांना भीमराव, नानेराज, नथोबा ही तीन मुले होती, बाबांची आई राधाबाई किसनराव निंभोरकर,   वडील- किसनराव निंभोरकर.  दाम्पत्याला  :- १) तुळसाबाई २) हिराबाई  ३) रुखमाबाई, ४).इंदूबाई चार मुली.- कमलाकर आणि  वामन दोन मुले अशी एकूण सहा अपत्य होती.... या दाम्पत्य उदरी जन्मलेलं हे "रत्न".
   त्याच्या आई वडिलांनी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना महानुभाव पंथाचे व स्वामीच्या आचार विचारांची ओळख असल्याने त्यांनी बालवयातच  महानुभाव पंथासाठी महानुभाव पंथात दिले.
          कारण, या परिवारातून आज पावेतो एकच नव्हे, तर पाच रत्न दिले. या पंथाचे आचरणा नुसार धर्म धुरा सांभाळण्यासाठी.
        त्यात पहिला कोहिनुर होते वैराग्यमूर्ती परम पूज्य परम महंत आचार्य श्री कानळसकर बाबाजी महानुभाव. अर्थात पूर्वाश्रमीचे भीमराव निभोरकर,
  त्यानंतर पंडित ईषाधिष्टीत नानोदा बिडकर,... त्यानंतर आले ते  पंडित ईषाधिष्टीत कमलाकर बिडकर अर्थात आताचे परम पुज्य परम महंत उपाध्य कुलभूषण आचार्य कैवल्यवासी सरळ बाबाजी महानुभाव.
         त्याच्या प्रयत्नाने सामील झाले ते पंडित ईषाधिष्टीत वामनराज बिडकर अर्थात उपाध्य कुळाचार्य आचार्य. प्रवर गुरुवर्य श्री बिडकर बाबाजी शास्त्री महानुभाव.
       तसेच त्यानंतर गृहस्थाश्रम सांभाळण्याची जबाबदारी म्हणून घरी थांबलेले व नंतर कालांतराने त्यांनी या धर्मप्रचाराची ध्वजा खांद्यावर घेऊन महंत कैवल्यवासी कानळसकर  बाबाजी मोरवाडी,नाशिक यांना निमित्त करून *नथुजी निंभोरकर अर्थात पंडित ईषाधिष्टीत श्रीनथोबा कानळसकर, यांनी संन्यास दीक्षा घेतली. अश्या तऱ्हेने या पाच पांडवांनी या पंथाची धर्मध्वजा खांद्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून पंथाचा प्रचार व प्रसार करत आहे.
             बाबांचा जीवन प्रवास.....
           वैराग्यमूर्ती कैवल्यवासी भीमराज बिडकर अर्थात महंत कानळसकर बाबाजी महानुभाव यांनी वयाच्या पाचव्या वर्षी घर सोडले व थेट गाठलं ते तत्कालीन महानुभाव पंथाचे ब्रह्मविद्या शास्त्राचे विद्यापीठ असलेलं बोरी, जि. परभणी येथील महानुभाव आश्रम.
       व तिथेच उपाध्ये कुळाचार्य आचार्य कैवल्यवासी महंत श्री वर्धनस्थ बाबाजी यांच्या मार्गदर्शना खाली ब्रम्हविद्या शास्त्राचे धडे गिरविले व त्याच्याच मार्गदर्शनाने मार्गात आले ते आदरनिय नांनोदा बिडकर व त्याच्याच सोबतीला निघाले ते कैवल्यवासी कमलाकर बिडकर त्यांनी ही उपाध्य कुळातील तत्कालीन कुळाचार्य कैवल्यवासी श्री वर्धनस्थ बाबाजी(,जुने) त्यांच्याच मार्गदर्शनाने ब्रम्हविद्या शास्त्राची धडे गिरविले.
          ब्रह्मविद्या शास्त्रात आपणास परिपकवता आणत असताना त्यांनी ब्रम्हविद्या शास्त्राचे धडे तर गिरवलेच त्यासोबत त्यांनी अनुभवातून परिपकवता आणली, ती मार्गसेवेत मार्ग व्यवस्थेत.
         आणि खरोखर सांगतो बाबांनी त्यात केलेली निपुनता या पंथात आज पावेतोही कुणी केली नाही व यापुढेही कुणी करणार नाही हेच म्हणावं लागेल.
          बाबांनी वयाच्या ५ व्या वर्षी या महानुभाव गुरुकुलात तत्कालीन उपाध्य कुळाचार्य कैवल्यवासी ओंकार दादा बिडकर यांच्या सानिध्यात आल्यानंतर काही काळ मार्गात व्यवस्थेतील मार्गदर्शन घेऊन मार्ग सेवा करत असताना,
          सुरुवातीस महंत लांडगे बाबाजीचे व्यवस्थापनात असलेला आचार्य श्रीवर्धनस्थ बाबांचा मार्ग हा महंत लांडगे बाबांनी त्यांचा स्वतःचा परिवार कनाशी येथे स्थायिक केल्यानंतर मार्गाच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी ही श्रध्येय श्री कमलाकर बिडकर याच्यावर आली.
         आणि खरोखर बाबांनी आपल्या कार्यात कोणत्याही प्रकारची उणीव भासणार नाही याची परिपूर्ण दक्षता घेऊन त्याच्याकडे आलेली ती जबाबदारी १९७० साला पासून सुमारे ५० वर्ष सांभाळली.
         नुसतं प्रणवाश्रमचीच नव्हे तर पंथात बहुतांश छोट्या मोठया होणाऱ्या सोहळ्याचे नियोजन हे महंत सरळ बाबा यांच्या मार्गदर्शनाने  झाले.
        बाबांचे ते नियोजन अत्यंत प्रशसनिय असायचे.
         बाबांना उपाध्ये कुळातील महंती अर्थात उपाध्ये कुलभूषण ही महती प्रदान झाली ती १९७२ साली हिवरखेडे, जि जळगाव येथे झालेल्या ब्रम्हविद्या प्रवचन सोहळ्यात.
          तेव्हा पासून त्या सिंहासनावर विराजमान झाले बाबाजी आज ही त्या गादीवर मानाने जरी लहान पद असलं तरी त्यांनी अनेक दैदिप्यमान उपक्रमानी पंथासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे,
          असे कार्य कर्तृत्व करून या पंथाच्या मार्ग व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवत आजच्या विज्ञान युगाच्या आधाराने नवनवीन संकल्पना योग्य पद्धतीने हाताळून मार्ग व्यवस्था सांभाळली व ती आज तागायत सांभाळत होते.
         बाबाजींच्या हातून काय झालं नसेल हे विचार करा,  बाबाजींनी दिले या पंथाला उपाध्ये शाखेला कुळाचार्य,
          बाबांनी स्वतः वयाने मोठे असतानाही पंथातील सर्व मान्य असलेली उपाध्ये कुलाची कुलाचार्य ही महंती आचार्य श्री वर्धनस्थ बाबाजी यांना दिली,
        बाबांनी रिद्धपुर, पाचोड, बीड, चांदूरबाजार, रणाईचे, मोरवाडी, अमळनेर, कनाशी, यवतमाळ तसेच दिल्ली ....
       तसेच अनेक ठिकाणी पंथीय मठ मंदिराची उभारणी करून तिथे पंथीयांसाठी शास्त्र अध्ययनासाठी सुविधा उपलब्धता करून दिल्या व त्याद्वारे अनेक शिष्यांना मोठं मोठ्या मार्गाची जबाबदारी सोपवली.
         बाबाजीचे अनेक शिष्य पंथात आज  संपूर्ण महाराष्ट्र सह संपूर्ण भारतात विखुरलेली आहे.*
         बाबाजींनी आपल्या श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली खिचपुरी तथा खिरपुरी उपहार परंपरा ही उपाध्य शाखेच्या वतीने दर तीन वर्षाने होत असलेला खीरपुरीचा महोत्सव सुरू केला व तो आजतागायत सुरू आहे.
          व त्याचे स्वरूपात दिवसेंदिवस बदल घडवत त्याद्वारे यथार्थ ज्ञानार्जन देखील समाजास कसे देता येईल,..  व त्यातून पंथाचे कार्य कर्तृत्वात कसा बदल घडवून आणता येईल,... यावर बाबांचा नेहमी चिंतन असायचे व प्रयत्न करीत राहिले ते अंतिम श्वासा पावेतो.

मूर्ती वयाने लहान पण कीर्ती महान ....
          *ब्रम्हविद्या शास्त्रात पारांगत असून ही बाबांनी स्वतः कधी कुठं पोथीचा कार्यक्रम केला नाही. परंतु अनेकांच्या कार्यक्रमात बाबांनी तनमन धनांनी सहकार्य केले.
        बाबाजींनी घडवून मढवून तयार केलेल्या त्यांच्या पेक्षा वयाने लहान असून पंथात जेष्ठतेच्या मानाने गादीवर आरूढ असलेल्या,.... उपाध्य कुळाचार्य श्रीवर्धनस्थ बाबाजीच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरुपीत अनेक विषयांवर ब्रम्हविद्या निरूपण सोहळे हे त्याचबरोबर बाबांनी उपाध्ये कुळाचार्य श्रीवर्धनस्थ बाबांच्या वाणीतून.....
         सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरुपित.... ब्रह्मविद्या शास्त्र ज्ञान प्रबोधन सोहळे अर्थात ब्रह्मविद्या निरोपनाचे कार्यक्रम आयोजित केले,....
       त्यापैकी.. जातेगाव, टाकरखेडा, सणसवाडी, लालपाडी व तांदळवाडी इत्यादी ठिकाण ची कार्यक्रम सर्वाना ज्ञात आहे.
        इत्यादी ठिकाणी भव्य मोठ्या स्वरूपात ज्ञान निरुपणाचे कार्यक्रम देखील पंथाच्या इतिहासात वेगळा ठसा उमटवणारे उपक्रम राबवून पण त्याच्या नावाला उज्वल केले. 
  बाबांच्या नियोजनाचे कौशल्य हे सतत जाणवत राहील त्याच कारणाने मीच नव्हे तर आज संपूर्ण महानुभव पंथ बाबांना आपला आधारवड कोसळला आहे असेच भासत आहे, आणि कायमस्वरूपी भासेलही यात काही शंका नाही.   
        बाबा तुमच्या जाण्यानंतर अनेक जण निर्माण होतील परंतु बाबा तुमचा हात कोणीही धरू शकणार नाही तुमचं उभा असंण हेच कार्यक्रमाचे नियोजन असायचं.
        बाबा मी आपणा सोबत तुम्ही गेल्या कित्येक महिन्याच्या प्रदीर्घ आजारपणात असतानाही मन मोकळं बोलू शकलो, ते तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हाला भेटण्यासाठी आलो व माझी व तुमची नजरा नजर होताच क्षणी दिलेला सुरेश आवाज हा अजूनही माझ्या कानात कान सुन्न करूनही निनादत आहे.
      तो आवाज नाही तर ते आवाज होता माऊलीचा. आणि खरोखर त्या दिवसानंतर, ना आवाज ऐकला, ना माझ्याकडे मायेने बघतात ते डोळे.
        कारणही तसेच होते माझे बाबा झुंज देत होते त्या नियतीच्या डावाशी, आणि खरंच सांगतो माझ्या भेटी दरम्यान आमची चर्चा काय झाली ठाऊक?
       ती चर्चा होती, बाबाच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक खिचपुरी करायची हो खरोखर एक खिचपुरी करायची, तीही पंथाच्या इतिहासात गणली जाईल.
       त्याची ही तळमळ ह्दयस्पर्शी होती मी त्याही वेळी अनुभवली की श्रध्येय बाबाजी एका बाजूनी मृत्यूशी झुंज देताय व दुसऱ्या बाजूने पंथातील एक सोहळ्याचे नियोजनाची आखणी ही करताय कितीही तळमळ व किती धर्म सेवेची आवड अश्या या महान धर्म रक्षकाला शतशः प्रणाम...
       पण बाबांच्या जाण्याने मी शब्द खुळा झालो आयुष्यात कधी डोळ्यातून अश्रू काढला असेल की नाही नाही. परंतु जेव्हा कधी काढावे लागले ते फक्त एक मला भेटलेल्या त्या अनामिकेच्या जाण्याने, व बाबा गेल्याची बातमी कानावर पडली, व फोनवर बाबा या जगात नसल्याचे
शब्द ऐकताच..... बाबा मी पोरका झालो,.... बाबा मी पोरका झालो....  बाबा मी पोरका झालो.... 
    महान धर्म रक्षकाला शतशः प्रणाम...

      अशा गुरु चरणाची गोडी, जीवन व्यवहारातील मोह,माया,बंधन तोडणारी  आहे,
 आजच्या वर्तमान काळात धर्म, पंत,संत संप्रदाय हे मानवी जीवन विकस चिरकाल टिकविण्यासाठीचे महत्त्वाचे साधन आहे. आणि या साधनांचा दिशादर्शक, दीपस्तंभ असणारा गुरु, आपल्या साधनेच्या बळावर लोक समूहास जीवन प्रकाश ज्योत नित्य तेवत ठेवण्याचा एक प्रयत्न करतात. सत्य मार्गावर चालण्याचा,बोलण्याचा जीवन जगण्याचा मार्ग दाखवितात.
    अशा अनुभवी,मानभावी,निस्वार्थ स्वभावी, गुरुचरणी साष्टांग दंडवत ...प्रणाम ......
                                           क्रमशः .....
लेखक/कवी/संपादक
प्रा.श्रीलक्ष्मण बालू पाटील
अमरिशभाई आर पटेल सी. बी. एस. ई. स्कूल, शिरपूर.जिल्हा-धुळे
चलभाष : ९५५२९१८०६३       







Comments

Popular posts from this blog

वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )