पंढरीचे वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*पंढरीचे वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
महाराष्ट्रात वारकरी सांप्रदाय हा अनादी कालापासून चालत आलेला सांप्रदाय आहे.या वारकरी सांप्रदायातच संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत पुष्कळसे संत होऊन गेले.
आणि त्याच वारकरी परंपरेतील विदर्भातील एक महान संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सुद्धा पंढरीचे वारकरी व वारकरी संतच होते.
महापुरुष दुर्लभ असतो व आपण सामान्यपणे त्यांना ओळखू शकत नाही.खरा सत्पुरुष आत्मप्रौढी पासून दूर असतो आणि प्रसिद्धी परान्मुख असतो.आपले तप,ज्ञान,अध्यात्मानुभव यांचा वाजागाजा करीत नाहीत.म्हणूनच त्यांचे विचार सामान्यांना एकदम समजत नाहीत.म्हणूनच राष्ट्रसंत वारकरी संत असूनही ते सामान्य जनांना समजलेच नाहीत.वारकऱ्यांची मुख्य लक्षणे कोणती याचा प्रथम विचार करू.
*वारकऱ्यांची मुख्य लक्षणे* :-
१)वारकऱ्यांचे दैवत श्री विठ्ठल.
२)पंढरपूरची नित्यनेम वारी.
३)तुळशीची माळ गळ्यात घालणे व गोपीचंदन लावणे.
४)एकादशी व्रत.
५)रामकृष्णहरी या नाममंत्राचा जप करणे.
६)संतसंग .
७)ज्ञानेश्वरी पारायण.
हि साधने जो करतो त्यालाच वारकरी म्हणतात.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा या साधनांनीच आचरण केले.त्यामुळेच ते पंढरीचे वारकरीच होते.
ग्रामगीतेप्रमाणेच *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग गाथा* हा सुद्धा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे.या ग्रंथात राष्ट्रसंतांनी लिहिलेल्या अभंगावरून त्यांची भक्ती आपल्या लक्षात येते.
*१) विठ्ठल भक्ती:*-
राष्ट्रसंतांची पंढरीच्या विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा होती.ते आपल्या अभंगात सांगतात.
*कोणाचेही न रुचो बोल | सखा सोडोनि विठ्ठल ||*
*तूंचि जिवीचा जिव्हाळा | मना लागो तुझा चाळा ||*
*मार्गी चालता बोलता | मनी रंगो तुझी कथा ||*
*तुकड्या म्हणे मी उनाड | देवा पूर्वा तुम्ही कोड ||*
आपण सुद्धा याच मार्गाने चाला असेच ते आपल्याला सांगतात.
*धोपट हा मार्ग राजरोस चाला | आळवा विठ्ठला मनोभावे ||*
*तयावीण नाही साधन या युगा | चला उठा निघा भक्ती मार्गे ||*
*यम नियमांच्या पडोनिया भिडे | खोवाल रोकडे आयुष्य हे ||*
*तुकड्यादास म्हणे कानी घ्या जी हाक | ठेवा जरा धाक यमाचा तो ||*
महाराज केवळ याच जन्मात नव्हे तर जन्मोजन्मी मी विठ्ठल भक्तीच करिन हे या अभंगातून सांगतात.
*जन्मोजन्मी ऐसी प्रीती | मज लागो गा श्रीपती ||*
*सदा संत पायी लिन | वृत्ती बाह्य उदासीन ||*
*सुखी गोड नाम साचे | सख्या पंढरी रायाचे ||*
*तुकड्या म्हणे लक्ष मन | दोनो यातची तल्लीन ||*
*२) पंढरपूर वारी :*-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पांडुरंगावर निष्ठा होती आणि ते दरवर्षीच नित्यनेमाने पंढरपूरची वारी करत असत.त्यांना पंढरपूर वारीच्या वेळीच जपान मधील सर्व धर्म परिषदेला जायचे होते.तेव्हा जपानला जाण्यापूर्वी राष्ट्रसंतांनी पंढरपूरला जाऊन पंढरीनाथाचे दर्शन घेऊनच पुढे प्रवास केला तरी आपली नित्याची वार्षिक वारी चुकू दिली नाही.आजारी असतानाही सण १९३८ मध्ये त्यांनी पंढरपूरची वारी केलीच.पंढरपूर वारीविषयी ते आपल्या अभंगातून सांगतात.
*वाचे विठ्ठल गाईन | नाचत पंढरी जाईन ||*
*ऐसे आहे माझया मनी | लागेन संतांच्या चरणी ||*
*रंग अंतरा | हरुनी देहभाव सारा ||*
*तुकड्या म्हणे होईन दास | देवा पुरवी इतुकी आस ||*
आपल्या जीवनाचे कल्याण करायचे असेल तर आपण पंढरपूरची वारी केलीच पाहिजे.
*करा जीवाचे कल्याण | नामी लावोनिया मन ||*
*सोडा आळस विकारा | वाट पंढरीची धरा ||*
*रंगा संतांचिये रंगी | नाचा आलिया प्रसंगी ||*
*तुकड्या म्हणे सोडा गर्व | भजा पंढरीचा राव ||*
*उठा रे सर्वहि चला पंढरीसी | भेटू विठ्ठलासी जाउनिया ||*
*खरा पांडुरंग दीनांचा कैवारी | संकटे निवारी धावोनीया ||*
*३) तुळशी माळ :*
राष्ट्रसंतांनी तुळशीची माळ गळ्यात घालून कपाळाला गंध लावून या वारकरी आभूषणांचा स्वीकार केला होता.
*भाळी लावावे चंदन | तेणे शांत होय मन |*
तसेच तुळशीच्या माळेविषयी ते सांगतात .
*जया गळा तुलसी माळ | तया कापतसे काळ ||*
*जया द्वारी वृन्दावन | तया येतसे विमान ||*
*गळा घालू तुळशीमाळ | तेणे दूर पळे काळ ||*
*तुकड्यादास म्हणे काही नाही त्याचे | जाणेल हे साचे तोचि खरा ||*
*४) एकादशी व्रत :*-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एकादशीचे व्रत केले.त्यांनी एकादशीचे दिवशी अन्न सेवन करून कधीच भजन किंवा कीर्तन केले नाही.ते सांगतात.
*चला चला पंढरीसी | व्रत करा एकादशी ||*
*५) नाममंत्र जप:*-
कलियुगात यज्ञ,याग,जप,तप,होमहवन हि साधने सांगितली नसून सर्व वारकरी संतांनी *"रामकृष्णहरी"* नामचिंतनच करावे असे सांगितले.राष्टसंतांनी हाच उपदेश केला.
*जळो जळो त्याची थोरी | ज्या नाम ना वैखरी ||*
*नको त्याचा संग | जया न रुचे पांडुरंग ||*
*तोचि असे एक भला | राम स्मरणे जो रंगला ||*
*तुकड्या म्हणे मोठा लाभ | एक नामाची दुर्लभ ||*
आपण "रामकृष्णहरी" नामचिंतन केले तरच आपल्याला सुख मिळेल त्यासाठीच त्यांनी *गुरुकुंज मोझरी येथे दासटेकडीवर "रामकृष्णहरी" मंदिर उभारले.*
*बाहो उभारोनि सारे | संत गर्जती विचारे ||*
*म्हणा मुखी राम राम | नाही या विठो विश्राम ||*
*सकळ सुखाची हि सुख | नामे लाभे ब्रम्हरस ||*
*तुकड्या म्हणे ऐका वेचे | नाम न सोडा मुखीचे ||*
*६)संतसंग :*-
राष्ट्रसंतांनी संतसंग करण्याचा उपदेश केला आहे
*संत सज्जनाचा धरा संग | तोचि माझा पांडुरंग ||*
*देवा प्रिय साधुजन | रंगे तेथे माझे मन ||*
*त्यांच्या रंगी रंग लाभे | वृत्ती अंतरंगी जागे ||*
*तुकड्या म्हणे साधुसंग | फेडी अज्ञानाचा पांग ||*
*७) ज्ञानेश्वरी :*-
वारकरी सांप्रदायात ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाला फार महत्वाचे स्थान आहे.राष्ट्रसंतांनीही "ज्ञानेश्वरी" ग्रंथाची थोरवी गाईली.
*गीता वर्म ज्ञानेश्वरी | दुजा नाही ऐसी थोरी ||*
*बहू करतील अर्थ | परी राहील अनर्थ ||*
*देवादिकांचा जो अंत | पार पावतील संत ||*
*तुकड्या म्हणे वाचा | वाचताही खुंटे वाचा ||*
या सर्व त्यांच्या अभंगावरून हेच लक्षात येते कि राष्ट्रसंतांनी आपल्या हयातीत वारकरी तत्वांचेच पालन केले व ते वारकरी संतच होते.
*विरोधाभास :-*
आता या ठिकाणी राष्ट्रसंतांनी लिहिलेल्या काही पदांबद्दल लोक शंका उत्पन्न करू शकतात त्या शंका अश्या
*शंका १*) *कश्याला पंढरी जातो रे*
*समाधान :*-
या म्हणण्यात महाराजांचा उद्देश तू पंढरीला जाऊ नको असा अर्थ करता येत नाही,तर कोणत्याही क्षेत्रात जाऊन तेथील विधीचा जर विचार,आचरण होणार नाही व घरी आल्यावर अयोग्य आचरण चालूच असेल तर पंढरीला जाऊन उपयोग नाही."जाऊ नका "असे त्यांना म्हणायचेच नाही.जर जाऊ नका असे त्यांना सांगायचे असते *तर राष्ट्रसंत स्वतः दरवर्षी पंढरपूरला कशाला गेले असते ?* व इतरांना जाण्यास प्रवृत्त व आग्रह तरी कशाला केला असता.
सोडा आळस विकारा | वाट पंढरीची धरा ||
सर्व करोनि चाकरी | पंढरीची वारी करी ||
करी पंढरीची वारी | धन्य धन्य तो संसारी ||
वाचे विठ्ठल गाईन | नाचत पंढरी जाईन ||
तुकड्या म्हणे आम्ही मेलो | जरी पंढरी ना गेलो ||
असे राष्ट्रसंतांनी अभंगातून स्पष्टच सांगितले आहे.
*शंका २)* *हरिनाम लिया न लिया*
*समाधान :*-
*सच काम किया जगमे जिसने | उसने प्रभू हरिनाम लिया न लिया ||*
या पदाचा अर्थ सत्य काम करणाऱ्याने हरी नाम घेऊच नये असा होत नाही.
असेच जर असते तर राष्ट्रसंतांनी आयुष्यभर सत्यच काम केले तरीही त्यांनी नामस्मरण केलेच.
*नोहे मना समाधान | देवा तुझ्या नामाविण ||*
*तुकड्या म्हणे जपू नाम सर्व काम सोडूनि ||*
या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वारकरीच होते हे सर्वांना कळण्याकरिता विस्तारभयास्तव राष्ट्रसंतांचे काही निवडक मोजकेच अभंग दिले आहेत.यामुळे वारकऱ्या-वारकऱ्यात म्हणजेच वारकरी व प्रचारकात (राष्ट्रसंत सुद्धा वारकरीच असल्यामुळे) हे मतभेद आहेत ते निवृत्त होतील व त्यांच्या व्यापकत्वाला मर्यादा येणार नाही.
अश्याप्रकारे राष्ट्रसंतांनी सांगितलेल्या वचनावर सर्वांनीच शुद्ध श्रद्धा ठेवून ज्ञानेश्वर महाराजादी संतांपासून तर राष्ट्रसंतांपर्यन्तच्या परंपरेतील संतांच्या मतैक्याचा मागोवा घेत प्रचारक,उपदेशक व कीर्तनकारांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पंढरीचे निष्ठावंत वारकरी संत होते हे सत्य समाजासमोर मांडावे.
या वारकरी राष्ट्रसंताच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक.
टीप:-हा लेख १)राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभंग गाथा व
२) श्री तुकाराम दादा गीताचार्य यांचा अभिप्राय लाभलेला "पंढरीचे निष्ठावंत वारकरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज "लेखक ह.भ.प.श्री ज्ञानेश्वर म.इंगळे या ग्रंथातून संकलित केला आहे
Comments
Post a Comment