वर्ग ३ ,४ व ५ साठी माहिती लेखन उतारे (सराव कार्य)



१. माझा वाढदिवस 

माझ्या वाढदिवशी मला खूप आनंद होतो. या दिवशी आईबाबा घर सजवतात. मला नवीन कपडे आणतात.
माझ्या वाढदिवसाला माझे सर्व मित्र घरी येतात. आईबाबा सगळ्यांना खाऊ वाटतात. आम्ही खूप मजा करतो, गाणी म्हणतो. गोष्टी सांगतो. दादा सगळ्यांचे फोटो काढतो.
मला माझा वाढदिवस आवडतो. या दिवशी सर्वजण माझे लाड करतात.

२. माझी आई

माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती नेहमी माझी काळजी घेते.
मला शाळेत जायला मदत करते. माझा अभ्यास घेते.
माझी आई जेवण छान करते. तिच्या हातचे जेवण सगळ्यांना आवडते. ती खूप काम करते, घर स्वच्छ ठेवते. माझी आई गाणेपण छान म्हणते.
अशी ही माझी आई किती चांगली आहे! मला ती खूप खूप आवडते.

३. माझे बाबा

माझे बाबा रोज सकाळी लवकर उठतात. थोड्या वेळाने ते कामावर जातात.
माझे बाबा नेहमी कामात असतात, त्यांना नीटनेटकेपणा आवडतो.
ते माझा अभ्यास घेतात. आईलाही कामात मदत करतात. माझे बाबा माझ्याशी खेळतात. मला गोष्टी सांगतात. मला त्यांनी एक सायकल आणली आहे. ते माझे खूप लाड करतात.

४. माझी मातृभाषा

मराठी ही माझी मातृभाषा आहे. आम्ही घरी मराठीत बोलतो. आम्ही दूरदर्शनवर मराठी कार्यक्रम बघतो. आमच्याकडे मराठी वर्तमानपत्र येते. मला ते आवडते.

मराठीत 'ज्ञानेश्वरी'सारखे महान ग्रंथ आहेत. मराठीत विविध पुस्तके आहेत. आमच्याकडे माझी गोष्टींची व गाण्यांची पुस्तके आहेत. मला ती खूप आवडतात. मोठा झालो की मीसुद्धा मराठीत गोष्टी लिहिणार, गाणी लिहिणार.

५. माझा देश

भारत माझा देश आहे. माझा भारत विशाल आहे. येथे गंगेसारख्या विशाल नदया आहेत. हिमालयासारखे प्रचंड पर्वत आहेत.

माझा भारत फार प्राचीन आहे. येथे

विविध धर्माचे लोक सलोख्याने राहतात. येथे

अनेक भाषा बोलल्या जातात. येथे साधुसंत

जन्माला आले. गांधीजीसारखे थोर महात्मे जन्मले.
माझा भारत महान आहे. मला माझ्या भारताचा खूप अभिमान वाटतो.

६. आपला राष्ट्रध्वज

तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. त्यात

तीन पट्टे आहेत. वरचा पट्टा केशरी रंगाचा आहे. मधला पांढऱ्या रंगाचा आहे. तिसरा हिरव्या रंगाचा आहे. मध्यभागी निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे.

तिरंगा भारताचे मानचिन्ह आहे. रस्त्यावर टाकू नये. तो फाडू नये, तो खराब करू नये, आपण राष्ट्रध्वजाचा अपमान केला, तर आपल्या देशाचा अपमान होईल, म्हणून आपण त्याचा मान राखला पाहिजे.

७. स्वातंत्र्यदिन

१५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन आहे. आम्ही स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करतो. आम्ही गणवेश घालून शाळेत जातो. झेंडावंदन करतो. प्रमुख पाहुणे स्वातंत्र्यवीरांच्या गोष्टी सांगतात. त्या आम्हांला खूप आवडतात.

स्वातंत्र्यदिनी सगळेजण घरावर झेंडा लावतात. छातीवर बिल्ले लावतात. सगळीकडे देशभक्तीचे कार्यक्रम होतात. सगळेजण अभिमानाने स्वातंत्र्यदिन साजरा करतात.

८. माझा छंद-चित्रकला

चित्रकला हा माझा आवडता विषय आहे. माझा तो छंदच आहे. मला चित्रे बघायला आवडतात. चित्रे काढायला आवडतात. आईने माझ्यासाठी चित्रांचे पुस्तक आणले आहे. रंगीत पेन्सिलीपण आणल्या आहेत.

एकदा बाईंनी आम्हांला चित्र काढायला सांगितले. मी माझ्या घराचे चित्र काढले. ते बाईंना खूप आवडले. त्यांनी ते काचेच्या कपाटात लावले. सगळ्यांनी मला शाबासकी दिली.

९. माझा एक निश्चय/पण

माझ्या वाढदिवशी मी सुलेखनाचा निश्चय केला. मी दररोज पाच ओळी लिहितो. अगदी सावकाश लिहितो. काने सरळ काढतो. वेलांट्या वळणदार काढतो. एक अक्षर लहान व एक अक्षर मोठे असे करत नाही. मी खाडाखोड करत नाही.

माझे हस्ताक्षर हळूहळू सुधारत आहे. आईबाबा खूश आहेत. गुरुजीनी मला शाबासकी दिली. आता मी हस्ताक्षर स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावणार!

१०. माझे आवडते फूल - गुलाब

गुलाब हे अत्यंत सुंदर फूल आहे. त्याचा रंग लाल, गुलाबी, पिवळ

किंवा पांढराही असतो. त्याला अनेक सुंदर सुंदर आकार आहेत. त्याच सुगंध मनाला आनंद देतो. म्हणून गुलाबाचे हारतुरे करतात.

गुलाबाच्या झाडाला काटे असतात. पण गुलाबाचे फायदेही आहेत

त्याच्यापासून अत्तर बनवतात. गुलकंद बनवतात. गुलाब हा फुलांचा राजाच आहे. मला गुलाब खूप आवडतो.

११. माझा आवडता प्राणी

मांजर हा माझा आवडता प्राणी आहे. ती हुबेहूब वाघासारख दिसते. वाघासारखी डौलात चालते. म्हणून तिला वाघाची मावशी म्हणतात.

मांजरीला दूध आणि मासे खूप आवडतात. ती अत्यंत चपळ आहे. ती पटापट उड्या मारते. उंदराला पटकन पकडते. तिच्यामुळे आमच्या घरी उंदीर येत नाहीत.

खरोखर, मांजर हा उपयोगी प्राणी आहे.

Comments

Popular posts from this blog

वर्ग ३ कविता १. झोका , २. सिंह आणि कोल्हा व पाठ ३. आपण सारे खेळू गृहपाठ/स्वाध्याय  ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )

वर्ग ३. कविता १. झोका ( प्रश्न उत्तरे -गृहपाठ )